जाणीवा

मिलनाच्या शैय्येवर तू जेव्हा तुझ्या सर्व जाणीवा संपवून,
त्याच्या कुशीत निद्रिस्त आलिंगन देत असशील,

तेव्हा तुझ्या खोल मनात अनेक विचार
काहुर आणि हैदोस घालतील माझ्या जाणिवेचे,

होय ! त्याच जाणीवा ज्यांचा उंबरठा ओलांडण्यापूर्वी 
मी कधीकाळी तुझ्या संमतीचा गुलाम होतो,

त्याच जाणिवा, 
ज्यांच्या स्पर्शासाठी तुझा देह रात्रीच्या काळोखासोबत व्याकुळ व्हायचा,

हो ! अगदी त्याच जाणिवा, 
ज्यांचा पहिला प्रत्यय मी तुला दाट धुके, चिंब पाऊस 
आणि दोन देहांच्या ज्वाळांना साक्ष ठेऊन दिला,

माझ्या  जाणिवा काही धातूच्या संगमाने बनलेल्या नाहीत, 
ज्यावर अपेक्षा आणि संभ्रमाचा गंज चढला म्हणून त्याची धार कमी होईल ,

तुझ्या जाणिवा देखील असतील तशाच,
फ़क्त देह बदललेला असेल, 
पण माझ्या बाबतीत तसे होणे नाही,

कारण मी माझ्या जाणिवांना 
तुझ्या प्रेमाग्नीत समिधा म्हणून अर्पण करून बराच काळ लोटलाय, 

आजही गर्द मनाच्या अरण्यात डोकावत असताना 
मी शोधत असतो त्या हरवलेल्या जाणिवांना, 

आभास होतो अधूनमधून 
तुझा देह आणि त्या जाणीवांचे अवशेष 
छिन्नविच्छिन्न अवस्थेत का होईना, असतील तेथे म्हणून.....

ज्वाळांच्या ठिकाणी आज आठवणींना वणवा पेटलाय, 
म्हणून लिहिणे अपरिहार्य आहे....



Written by 
Prajjwal Khedkar



Comments

Post a Comment

Popular Posts