वीज


    का कोणास ठावूक ? जेव्हा पावसाच्या सरी पडू लागतात तेव्हा मनाच्या अडगळीच्या खोलीत दडवून ठेवलेल्या आठवणी मनाच्या घरात जागा करतात. मग त्या आठवणींचा पसारा आवरताना त्यात सापडू लागतात काही चेहरे. काहींची नावे सुद्धा आठवत नाहीत. पण ते काही क्षण, नकळत चेहऱ्यावर हसू उमठवतात. मग सुरु होतो प्रवास. भूतकाळातील एक रम्य सफर.
    गरम चहाचा एक कप घेऊन खिडकीपाशी आलो. पावसाच्या प्रत्येक सरीसोबत एक, एक आठवण त्या खोलीतून बाहेर पडत होती. माझीच गोष्ट मी पुन्हा एकदा वाचत होतो मी. बर वाटत असे कधीतरी. त्या आठवणींच्या ढिगार्यातून अचानकपणे एखादी आठवण काढून वाचण्यापेक्षा, आज आपण होऊन माझ्या समोर येत होत्या.
    
    अनेक ऋतू आहेत. वसंत, शरद आणि बरेच. पण चैत्राच्या पहिल्या पावसाशी नाळ का जोडली जाते हेच कळत नाही. त्या ओघळणाऱ्या प्रत्येक थेंबासोबत, न रडता ही रडल्याचे सुख भेटते. त्या वाहणाऱ्या पाण्यासोबत न वाहत जाता ही कितीतरी खोल बुडून जातो आपण.
    अचानक ती एक ‘वीज’ कुठूनतरी चमकते आणि त्या प्रकाशाला घाबरून पुन्हा साऱ्या आठवणी परत त्या अडगळीच्या खोलीत निघून जातात.
आठवणींना त्यानेच चाळत बसावे, ज्याला वर्तमानाचा कंटाळा आला आहे, भविष्याच्या विचारांचा वीट आला आहे. जावे कधीतरी स्वत:हून त्या अडगळीच्या खोलीत. उघडून चाळत बसावी आठवणींची पाने. पण तेवढ्यापुरतेच.

प्रत्येक वेळी ‘वीज’ चमकलेच असे नाही.............


Written by 
Suraj_2310

Comments

Post a Comment

Popular Posts