शृंगार

      कवि, लेखक, नट एकंदरीत कलाकार लोकांचे स्वतःचे असे एक वेगळे जग असते. हे आपण सर्वच जाणतो. ते कधी कोणता विचार करतील हे एक कोडेच आहे. असेच माझे एक मित्र जे की पेशाने कवि आहेत, काही दिवसांपूर्वी मला भेटले. भेटले म्हणजे अचानकच भेट झाली.
     खूप दिवसांनी ऑफिस सुटल्यानंतर अण्णांच्या टपरीवर गेलो होतो. तिथेच ते मला भेटले.
"काय कविराज, आज इकडे कुठे पाऊले वळली आपली." जास्त confusion नको म्हणून मी त्यांना या कथेत कविराज याच नावाने संभोधले आहे.
"काही नाही हो सहजच, मग काय चालू आहे आयुष्यात ?"
"एकदम मस्त, म्हणजे तुमच्यासारखे लयदार शब्दात, यमक जुळवत ते सांगता नाही येणार मला."
"तुम्ही चेष्टा करताय माझी..."
"नाही हो,तुम्ही घ्या आता समजून, प्रत्येकाला तुमच्यासारख्या कविता थोडीच करता येतात. हा पण तुम्ही मला शिकविले तर मी प्रयत्न जरूर करेन."
"त्यात शिकवायचे असे काय आहे. रोजच्या जीवनात सहजासहजी वापरल्या न जाणाऱ्या आणि उच्चाराला अवघड पण ऐकायला सुमधुर अश्याच शब्दांनी तर बनते कविता आणि ती इतरांना ही आवडते, नाही का ?"
"कसे काय जमते तुम्हाला. हे सगळे ऐकायला छान वाटते."
"त्यासाठी शब्दांचा अभ्यास लागतो आणि खूप सारा फावला वेळ."
"असे बोलून तुम्ही अपमान करत आहात माझा."
"अपमान काय यात, हा सगळा शृंगार शब्दांचाच, आम्ही फक्त त्याचे पाईक."
"शृंगार...?"
"हो शृंगार, जेव्हा तुमची प्रियसी, छानश्या साडीमध्ये, नाकात नथ, कानात बाली घालून तुमच्यासमोर येते, तेव्हा ती तुम्हाला शृंगारमय वाटते. तुमचे तिच्यावरचे प्रेम अनगीनत पातळीवर वाढते."
"हो खरे आहे पण..."
"पण माझ्या बाबतीत तसे नाही."
"ते कसे ?"
"जेव्हा माझी प्रियसी, पहाटेच्या पहराला झोपेतून उठत असते. तेव्हा तिचे उघडण्यासाठी धडपड करणारे ते डोळे, तिचे विस्कटलेले केस, आणि अंगभर चढलेला तो आळस जाऊ नये म्हणून पुन्हा माझ्या मिठीत स्वतः ला सामावून घेते तेव्हा तिचा तो लोभसवाणा चेहरा हा माझ्यासाठी तिचा शृंगार."
काहीवेळा साठी काय बोलावे तेच मला कळले नाही. क्षणभराचा प्रसंग त्यांनी त्यांच्या शब्दांनी अजरामर करून टाकला.
"मी निशब्द आहे तुमच्यापुढे."
"हाच तो फरक."
"म्हणजे..."
"आता बघा, ती समोरून आली आणि निघून गेली, हे वाक्य कसे वाटते ?"
"यात नवल असे काहीच नाही."
"आता हे बघा... सांजवेळी जशी सूर्याची किरणे या धरतीवर पडतात, तशी तिची पाऊले त्या वाटेने पुढे सरकली, सूर्य क्षितिजामध्ये मावळेपर्यन्त जशी आपली नजर त्याच्यावर खिळून राहते तसे ती जाईपर्यन्त मी तिला पाहत होतो आणि सूर्यास्त झाल्यानंतर सगळीकडे अंधार पसरतो तसेच काहीसे तिच्या जाण्याने माझ्या आयुष्यात झाले."
"वाह, क्या बात है."
"निष्कर्ष सांगायचा झाला तर तो असा, की आयुष्य प्रत्येकजण जगतो पण थोडा वेळ थांबून त्या जगलेल्या क्षणाला शब्दांची झालर चढवून, त्याला एक सुंदर कवितेमध्ये मांडणे प्रत्येकाला शक्यही नसते आणि तेवढा कोणाजवळ वेळही नसतो. हाच काय तो फरक."
"पण कविराज एक सांगू... भले शब्द नसतील आमच्याकडे पण काही क्षण आम्हीही जगलो आहे."
"शृंगार बघणाऱ्याच्या नजरेत
जगणाऱ्याच्या धुंदीत असतो
लिहला गेलेला प्रत्येक क्षण,
पहिला ही नसतो
आणि शेवटचा ही
शब्द फक्त त्याला अजरामर करतात
एवढेच..."

Written by
Suraj_2310

Comments

Post a Comment

Popular Posts