You And Me


     खूप दिवसानंतर आम्ही भेटत होतो. आमच्या त्या समुद्रकिनाऱ्यावरच्या भेटी आजकाल कमी झाल्या होत्या. आम्ही दोघे फक्त शांत बसून होतो. ती आपली एकटक त्या मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत बसली होती. मला तिला खूप प्रश्न विचारायचे होते. त्यासाठीच मी तिला इथे भेटायला बोलवले होते. पण तिला असे त्या सूर्याकडे पाहताना पाहून मी माझा विचार टाळला आणि तसाच तिच्या शेजारी बसून राहिलो.

“काय पाहतीयेस एवढे त्याच्याकडे. आत्ता मावळेल तो काही वेळात.”
“तुला त्याच्या मावळण्याचे कारण माहितीये का ?”

     तिची हीच गोष्ट मला आवडायची नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तिला काही ना काही कारण हवीच असायची. नसली तरी ती तयार करायची. ह्यात तिला काय समाधान मिळते ? असा प्रश्न पडायचा मला. आम्हा दोघांतला संवाद चालू ठेवण्यासाठी, तिने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मला द्यावेच लागणार होते.
“अग पृथ्वी सूर्याभोवती गोल फिरते, इयत्ता पाचवी, भूगोल. एवढी साधी गोष्टी माहित नाही का तुला आता ?”
“तुलातर भावनांमध्ये विज्ञान, गणित, भूगोल आणायची खूप वाईट सवय लागली आहे.”

     मी देलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तिला आजपर्यंत पटले नव्हते.
“हे बघ, मी काय कोणता लेखक नाही, ना कोणता साहित्यिक. एक साधा banker आहे मी. मला जे माहिती ते मी तुला सांगितले.”
“सोड मला नाही बोलायचे काही. मर जाऊन कुठेतरी तरी तू ?”

     ती असेच करायची नेहमी. उत्तर असायचे तिच्याकडे. पण जोवर माझ्याकडून तिला तिच्या मनाप्रमाणे उत्तर भेटत नाही, तोवर असाच अबोला धरून बसायची. मग मीच जायचो तिच्याकडे तिचे उत्तर ऐकण्यासाठी.
“ठीके, चुकलो. तू सांग, काय कारण आहे त्याच्या मावळण्याचे ?”
तिच्या चेहऱ्यावर हास्य आले. ते पाहून मला बरे वाटले खरे.....! ती मला समजावू लागली.
“आपले मन आहे ना हे खूप विचित्र आहे. आत्ता जे काही चालू आहे त्याच्या अगदी उलट हवे असते त्याला. आपल्या आयुष्यात जर सारखाच प्रकाश असेल तर त्याला रात्रीची ओढ लागून राहते आणि जर सारखाच अंधार असेल तर पहाटेची. त्यामुळे सूर्य स्वत:ला लपवून घेतो आणि अंधाराला वाट करून देतो. पण तरी त्या अंधाराची आपल्याला सवय होऊ नये म्हणून तो पुन्हा येतो, पहाट घेऊन.”

     ह्याच गोष्टीमुळे मला तिची खूप काळजी वाटायची. दरवेळी अशी कोणतीतरी प्रतिक कोणत्यातरी भावनेला जोडून ती काय साध्य करायची हेच मला कळत नव्हते. पण तिला कुठेतरी थांबवायला हवेच होते. म्हणून मी तिला इथे बोलावले होते.
“हे सगळे ऐकायला खूप बरे वाटते.”
“म्हणजे तुला नक्की म्हणायचे काय आहे ?”
“या अश्या काल्पनिक दुनियेत जगून, या अश्या निरर्थक प्रतीकांमध्ये रमून, हरून जाशील कुठेतरी. जेव्हा तुला कळेल, की हे सगळे खोटे आहे, तेव्हा तुझ्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहील. आत्ताच थांब अशी वाहत जाऊ नकोस. आयुष्य म्हणजे नाटक नाही, पर्दा पडला की सगळ संपायला ?”
तिने सगळे शांतपणे ऐकून घेतले. तिने माझ्याकडे बघून स्मितहास्य दिले आणि पुन्हा त्या मावळणाऱ्या सूर्याकडे पाहून ती म्हणाली,
“का ? असे का नाही होऊ शकत ? हे काय सूर्य मावळला. संपले आजचे नाटक. पडला पर्दा. नाही का ?”

     ती आधीपासूनच अशी कोड्यात बोलायची. पण जेव्हापासून तिने नाटकात काम करायला सुरवात केली, तिची कोडी वाढत गेली.
“कधीतरी सरळ, सोपे बोलत जा, प्रत्येक गोष्टीत कोडी हवीच का ?”
“का ! कारण तू दरवेळी हारतोस म्हणून.......”
“मी हारत नाही.... मी तुला जे आहे ते स्पष्ट सांगतो. पण तू त्यांना अश्या काहीतरी प्रतीकांचे रुप देतेस. जे मला करता येत नाही.”
“इथेच तर चुकतोस तू.”
“मी नाही तू चुकतेस.”

      मला तिच्याशी वाद घालत बसायचे नव्हते. पण ती एकून घ्यायला तयारच नव्हती.
“तुला आवडत नसले तरी मी अशीच राहणार. माझ्या कल्पनांच्या विश्वात. इथे मी माझ्या प्रतीकांसोबत कुठेही फिरू शकते. बर वाटते मला इथे. इथे मी जमिनीवरील गोष्टी आकाशात घेऊन जाऊ शकते. इथे आकाश स्वत:हून मला भेटण्यासाठी खाली येते.”
      ती जे काही बोलत होती, ते माझ्या समजण्याच्या पलीकडचे होते. मी हारलो होतो तिच्यापुढे.
“मला हे बोलायचे नव्हते. पण जेव्हा कल्पना करून थकशील, जेव्हा आकाश कोणते आणि जमीन कोणती हे कळणार नाही. प्रश्नांची उत्तरे भेटायची थांबतील. तुझीच कोडी तुला सुटणार नाहीत. तेव्हा स्वत:हून येशील माझ्याकडे, त्या खऱ्या जगात.”

      ती जशी होती तशीच होती. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य तसेच होते. तिच्यावर माझ्या बोलण्याचा काहीच फरक पडला नव्हता.
“पुन्हा चुकातोयेस तू. मी नाही तू येशील माझ्याजवळ. जेव्हा त्या मतलबी दुनियेत, प्रेमाचे चार शब्द ऐकायला तरसशील. गणिताची आकडेमोड, विज्ञान, भूगोल यांचे सिद्धांत जे कमी व्हायच्या ऐवजी वाढत चालले आहेत, त्यांना कंटाळून, जेव्हा आजूबाजूच्या गर्दीत तू स्वत: हरवून जाशील. तेव्हा आपणहून येशील माझ्याकडे.

मी वाट पाहीन तुझी इथे.”

“म्हणजे तू इथून बाहेर पडणारच नाहीस का कधी ?”
“तू पडला आहेस ना, परत आल्यावर सांगशीलच तू मला सर्व काही. काळजी घे.”
तिने तिचे अश्रू तिच्या हास्यामध्ये लपविले. ते न समजण्याइतका भावनाशून्य झालो नव्हता मी. जाताना ती फक्त एकच वाक्य म्हणाली......
“जेव्हा परत येशील, तेव्हा एखादी छानशी कविता ऐकवेन........!”

      ती आमची शेवटची भेट. ती बोलली होती तसच झाले. ती नाही आली माझ्याकडे कधी. मीच गेलो तिच्याजवळ. तिथे गेल्यावर, तिने बनवलेले ते विश्व तिथेच होते, तिच्या कल्पना तिथेच होत्या, पण ती मात्र नव्हती तिथे. कदाचित मी येणार हे माहीतच होते तिला. म्हणून तिने तिचे ते जग माझ्यासाठी सजवून, जपून ठेवून ती निघून गेली. मी इथेच तिची वाट पाहत थांबलोय,

 “तिच्या डायरीच्या, ह्या पानावर.............”





Written by 
Suraj_2310

Comments

Post a Comment

Popular Posts