शतरंज


एक शतरंज चा डाव होता, फक्त एक डाव........
   त्यानंतर त्यामध्ये काही प्यादी आली. त्या प्याद्यांना ना कोणता रंग होता, ना कोणता आकार. सगळेच एकसारखे दिसायचे. खूप दिवस एकत्र राहिले ते.....
   काही काळानंतर, प्याद्यांना आकार आले. कोणी हत्ती झाले, कोणी घोडा, कोणी उंट, ‘एक वजीर आणि एक राजा झाला’ आणि बाकीचे तसेच प्यादी म्हणून राहिले. त्यांच्यावर रंगही चढले. कोणावर सफेद तर कोणावर काळा रंग चढला. काळी प्यादी डावाच्या एका बाजूला गेली तर सफेद एका बाजूला. खेळला सुरवात झाली.
   दोन्ही रंगाच्या प्याद्यांनी एकमेकांवर चाली करायला सुरवात केली. सगळेच एकमेकांच्या सरस होते. कोण जिंकेल कोण हरेल काहीच सांगता येत नव्हते. पण जेव्हा सफेद घोडा आणि सफेद वजीर चाल करू लागले, तेव्हा त्यांच्यापुढे कुठल्याच काळ्या प्याद्याचा निभाव लागला नाही. शेवटी सफेद प्याद्यांनी, काळ्या प्याद्यांना क्षय दिला. काळ्या राजाला मात भेटली. तो शतरंजच्या डावातून बाहेर फेकला गेला. खेळ इथे संपला ?
तर नाही...........

   सगळे आपापल्या जाग्यावर स्थिर झाले. मधूनच सफेद घोड्याने हालचाल करण्यास सुरवात केली. त्याच्यासोबत काही प्यादीही आपापल्या जागा सोडू लागले. काय चालू आहे, कोणालाच काही कळत नव्हते. “वजीराला कळून चुकले, सफेद राजा धोक्यात आहे. काही करून त्याला वाचविले पाहिजे. नाहीतर सगळ्यांनाच क्षय आणि मात भेटेल. जिंकलेला डाव हरू आपण.” त्याने उरलेल्या प्याद्यांना राजाच्या चारी बाजूंना उभे केले आणि स्वत: बाजूला जावून थांबला.
   सफेद घोड्याने आणि त्याच्या प्याद्यांनी राजाला मात देण्यासाठी त्याच्याभोवती असलेल्या प्याद्यांना डावातून बाद करायला सुरवात केली. हळूहळू, एक, एक करून प्यादी राजाला वाचविण्यासाठी बाद होत होती. शेवटी काही मोजकीच प्यादी राजासोबत उरली. आता राजाला क्षय देणे सोपे होते. पण जोपर्यंत वजीर आहे तोपर्यंत राजाला मात देणे कठीण होते. पण एकटा वजीर तरी राजाला किती वेळ वाचवू शकणार ?
   राजाने त्याच्या जवळील प्याद्यांना पुढे सरकण्याचा इशारा केला. राजा असे का करतोय ? हे त्यांना कळलेच नाही. पण त्याचा हुकुम म्हणून ते पुढे सरकले.
   सफेद घोड्याने त्याची प्यादी राजाच्या दिशेने पाठवली. राजा जरी एकच पाउल चालू शकत असला तरी तो राजा होता. इतक्या सहज तो हरणार नव्हता. कितीतरी ह्यूह रचले गेले, पण राजाला क्षय देण्यात घोड्याला यश आले नाही. प्रत्येक वेळी तो त्यातून बाहेर पडायचा.
   वजीर जो बाजूला जाऊन थांबला होता. तो सगळे काही पाहत होता. त्याला कळले होते कोण आपल्या सोबत आहे आणि कोण राजाला मात देण्याचा प्रयत्न करत आहे, राजाला काही करून वाचविणे तर भाग होते. वजीराने आपली जागा सोडली. “रंग जरी एक असला तरी वृत्ती सुद्धा एकच असते असे नाही.” एक एक करून तो सफेद घोड्याच्या प्याद्यांना बाद करू लागला. राजाने ज्या प्याद्यांना पुढे सरकण्याचा हुकुम दिला होता, ती डावाच्या दुसऱ्या टोकाला पोहचली. “त्यांनी काही निवडक प्याद्यांना जिवंत केले.” सफेद घोडा पेचात सापडला. त्याचा निभाव लागणे आता कठीण आहे हे त्याने जाणले. म्हणून त्याने स्वत: राजावर चाल करून जायचे ठरवले. तो शेवटची चाल चालणार तितक्यात वजीर त्याच्या समोर येऊन उभा राहिला. पुन्हा जिवंत झालेल्या प्याद्यांनी त्याला घेरले. “घोड्याने वजिराला डावातून बाद केले.” पण पुढच्याच चालीला तो डावातून बाद झाला.
“शेवटी राजा हा वाचलाच” ......................
   घोड्याने असे का केले ? त्याला ह्यातून काय भेटले ? जेव्हा काळा राजा बाद झाला तेव्हा सफेद राजाला बाद करून आपण राजा होऊ, असे त्याला वाटले. पण तो विसरला होता हा ‘शतरंज’ आहे. जर राजाला क्षय भेटला तर सगळ्यांनाच मात भेटणार. आणि तो सुद्धा ह्याच खेळाचा एक भाग आहे........
   पुन्हा सगळी प्यादी मुळ स्वरुपात आली. ना कोणता रंग, ना कोणता आकार, ना कोणी ‘वजीर’. फक्त राजा तसाच राहिला. काही काळानंतर सगळे तो डाव सोडून निघून गेले........
   त्या डावात राहिल्या होत्या, त्या आठवणी, फक्त आठवणी. सोबत घालवलेले क्षण. त्यांच्या खुणा......
   संघर्ष झाला, आपलेपण, परकेपण सगळे अनुभव आले. छल, कपट, त्याग, लोभ, प्रेम, वैमनस्य सगळ्या छटा उमटल्या. पण आता जेव्हा तो ‘शतरंज’ चा डाव बघतो तेव्हा असे वाटते, का संपला तो खेळ. का निघून गेली ती सर्व प्यादी ? कारण त्यांचे इथले कर्म संपले. एकाच जागी थांबून आयुष्य नाही काढता येत. पुढे जात राहणे हाच आपला धर्म.
   येतात अधून मधून ती प्यादी त्या ‘शतरंज’ च्या डावावर, “राजाला भेटायला.” आठवणी जाग्या करायला. तो राजा त्यांच्या ऐक्याचे प्रतिक बनून गेला आहे. फक्त त्याच्यावर आता ‘धूळ’ चढली आहे. काळाची.................


Written by 
Suraj_2310




Comments

Post a Comment

Popular Posts